‘दाग अच्छे है’ द्वितीय तर फिनोलेक्सच्या ‘वारेबुवा’ एकांकिकेला तृतीय क्रमांक; नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
रत्नागिरी :
पुणे येथील महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आणि स्वांतत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रंगलेल्या मानाच्या पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने (स्वायत्त) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाविद्यालयाच्या ‘उजेड-अंधार’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. याच महाविद्यालयाच्या ‘दाग अच्छे है’ एकांकिकेने द्वितीय, तर फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘वारेबुवा’ एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, लांजा, देवगड आदी भागांतील १५ महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला होता.
वैयक्तिक पुरस्कारांची यादी
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात उत्तम कामगिरी करत विविध वैयक्तिक पुरस्कारांवर मोहर उमटवली:
- सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक: राज शिंदे (‘उजेड-अंधार’ – गोगटे-जोगळेकर महाविद्यालय)
- सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक: स्वानंद शेणई (‘वारेबुवा’ – फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय)
- सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय: तन्वी सावंतदेसाई (‘दाग अच्छे है’)
- सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य: तनिष्का शिरधनकर (‘उजेड-अंधार’)
- अभिनय नैपुण्य (अभिनेत्री): शारदा भंडारे (‘वारेबुवा’)
- अभिनय नैपुण्य (अभिनेता): विशाल सुर्वे (‘वारेबुवा’)
अभिनय उत्तेजनार्थ पुरस्कार:
- शिवमणी पाळेकर (‘दशावतार’ – स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड)
- मनाली चव्हाण (‘डाईट प्लान’ – आठले-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख)
- तन्मय डांगे (‘दाग अच्छे है’ – गोगटे-जोगळेकर महाविद्यालय)
- पृथ्वी मोहिते (‘बायोमॅट्रिक’ – डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण)
- प्रार्थना सावंत (‘सदाफुली’ – फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय)
विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य नाट्यगृह आणि मार्गदर्शन शिबिर
गुरुवारी पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, तहसीलदार रामदास म्हात्रे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर, डॉ. संजय केतकर आणि परीक्षक डॉ. संजीवकुमार पाटील, चंद्रशेखर कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी घोषणा केली की, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह विनामूल्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी अभिनय, दिग्दर्शन आणि रंगभूमीविषयक मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाईल, ज्यामुळे स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 27-08-2026














