न्यू जर्सी येथे पर्यावरणपूरक मूर्तीची होणार प्रतिष्ठापना
चिपळूण:
कोकणातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली येथील प्रसिद्ध गणेशमूर्तिकार राजेश नरळकर यांनी साकारलेली पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती यंदा थेट अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विराजमान होणार आहे. आपल्या वडिलोपार्जित मूर्तिकलेचा वारसा जपणाऱ्या नरळकर यांच्या कलेला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पोचपावती संपूर्ण परिसरासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
सुर्वे कुटुंबाच्या विनंतीवरून सुबक मूर्तीची निर्मिती
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने चिपळूण तालुक्यातील मूर्ती शाळांमध्ये सध्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. खांदाट पाली गावातील माहेरवाशीण असलेल्या सुर्वे (आंब्रे) कुटुंबियांचे सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे वास्तव्य आहे. परदेशात राहूनही कोकणातील संस्कृती आणि सणाची परंपरा जपण्यासाठी त्यांनी यंदा राजेश नरळकर यांच्याकडे शाडू मातीची मूर्ती तयार करून देण्याची विनंती केली होती.
कमी कालावधीचे आव्हान स्वीकारत नरळकर यांनी अत्यंत सुबक, रेखीव आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारली असून ती लवकरच अमेरिकेसाठी रवाना होणार आहे.
पर्यावरणपूरक शाडू मातीची परंपरा
सध्याच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींचे प्रमाण वाढले असले, तरी नरळकर कुटुंबाने पिढ्यानपिढ्या चालत आलेली शाडू मातीच्या मूर्तींची परंपरा कायम ठेवली आहे. राजेश नरळकर हे आपल्या कुटुंबाचा हा कलावारसा अत्यंत समर्थपणे पुढे नेत असून, त्यांच्या पर्यावरणपूरक मूर्तींना गणेशभक्तांकडून दरवर्षी मोठी मागणी असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 27-08-2026














