अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश; नोंदणीनंतर सात दिवसांत मिळणार प्रमाणपत्र
रत्नागिरी :
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार अधिक सुरक्षित आणि दर्जात्मक करण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भोजन शिजवून देणाऱ्या प्रत्येक शाळेला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (FSSAI) ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांत प्रमाणपत्र दिले जाणार असून, अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांना तातडीने नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.
शाळा व्यवस्थापनावर पूर्ण जबाबदारी
शाळांमध्ये पोषण आहाराचा दर्जा राखण्यासाठी शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे:
- परवाना पडताळणी: शाळा व्यवस्थापन समिती, बचत गट, स्वयंसहायता गट किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत आहार दिला जात असल्यास त्यांच्याकडे वैध FSSAI नोंदणी किंवा परवाना आहे का, याची संपूर्ण पडताळणी करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाचीच राहील.
- गुणवत्ता तपासणी: या नोंदणीमुळे पोषण आहाराची स्वच्छता, गुणवत्ता आणि घटकांची नियमित तपासणी करणे शक्य होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दैनंदिन भोजनाची सुरक्षितता वाढून विषबाधा किंवा अस्वच्छतेच्या घटनांना पूर्णपणे आळा बसेल.
तक्रार निवारण यंत्रणा आणि प्रबोधन
चांगल्या आहाराच्या सवयी आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळांमध्ये पालक व विद्यार्थ्यांची नियमित प्रबोधन सत्रे आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
तसेच, पोषण आहाराच्या दर्जाबाबत काही त्रुटी किंवा अस्वच्छता आढळल्यास पालक आणि नागरिक त्वरित तक्रार नोंदवू शकतील, अशी तक्रार निवारण यंत्रणा उभारी जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 27-08-2026














