India Beat Thailand by 94 Runs in Women’s Asia Cup 2026: महिला आशिया चषक स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात!

शेफाली वर्माचे तुफानी अर्धशतक; दीप्ती आणि नंदनी शर्माच्या फिरकीसमोर थायलंडचा ६५ धावांत उडाला बडगा

महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपल्या मोहिमेचा धडाकेबाज प्रारंभ केला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात थायलंड महिला संघाचा ९४ धावांनी मोठा पराभव केला. शेफाली वर्माची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर दीप्ती शर्मा व नंदनी शर्मा यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.

शेफाली वर्माची ३६ चेंडूंत ६४ धावांची धडाकेबाज खेळी

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर शेफाली वर्माने अवघ्या २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ३६ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची वादळी खेळी केली. तिला स्मृती मानधनाने १० चेंडूंत १९ धावा करून चांगली साथ दिली, मात्र ती धावबाद झाली. यानंतर प्रतिका रावलने २२ धावा, भारतीय फूलमालीने २० धावा आणि क्रांती गौडने १५ धावांचे योगदान दिले. भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावांचे आव्हान उभारले.

India Beat Thailand by 94 Runs in Women’s Asia Cup 2026: थायलंडचा ६५ धावांवर गुंडाळला डाव

१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना थायलंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजीसमोर दाणादाण उडाली. दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रत्येकी ३ बळी टिपले, तर श्री चरणीने २ आणि क्रांती गौडने १ बळी मिळवला. थायलंडकडून नन्नापत कोंचारोएनकाई हिने ४१ धावांची लढाऊ खेळी केली, मात्र इतर एकाही फलंदाजाला ६ धावांचा टप्पा पार करता आला नाही. संपूर्ण थायलंडचा संघ १६.१ षटकांत ६५ धावांत गारद झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 31-08-2026