रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर; समायोजनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर पायपिटीची वेळ!

रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर; समायोजनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर पायपिटीची वेळ!

१ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये विलीनीकरण; गेल्या ५ वर्षांत १७,६३४ विद्यार्थ्यांची संख्या घटली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अत्यंत अल्प पटसंख्या असलेल्या तब्बल ४०० प्राथमिक शाळा लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाच्या नव्या धोरणानुसार १ ते ५ इतकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन (विलीनीकरण) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीची प्राथमिक यादी तयार करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवरच्या शाळांपर्यंत पायपीट करावी लागणार असल्याने पालक व ग्रामस्थांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

५ वर्षांत १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची संख्या घटली :

कोकणातील ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे वाढते स्थलांतर आणि कमी होत चाललेला जन्मदर यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या सातत्याने रोडावत चालली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात १३१ प्राथमिक शाळा आधीच बंद पडल्या आहेत. याच पाच वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची संख्या घटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

SONA HERBAL

समायोजनाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या मुळावर :

सध्या १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक आणि इतर साधनसामग्रीचा होणारा खर्च विचारात घेऊन शासनाने या शाळा लगतच्या मोठ्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याचे धोरण आखले आहे. मात्र, कोकणातील भौगोलिक परिस्थिती डोंगर-दऱ्यांची, नद्या-नाल्यांची आणि विखुरलेल्या वाड्या-वस्त्यांची आहे. अशा परिस्थितीत गावची शाळा बंद होऊन शेजारच्या गावात किंवा वाडीत समायोजन झाल्यास लहान मुलांना पायपीट करत जाणे अत्यंत जिकिरीचे आणि पावसाळ्यात धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणावर बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.