DYSP Aaranksha Yadav Ratnagiri: डीवायएसपी आरंक्षा यादव यांनी स्वीकारला पदभार; रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नियुक्ती

माजी उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली; २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आरंक्षा यादव रत्नागिरीत कार्यरत

रत्नागिरी:

रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आरंक्षा यादव यांनी अधिकृतपणे रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार हस्तांतरणादरम्यान नीलेश माईनकर यांनी नूतन डीवायएसपी आरंक्षा यादव यांचे स्वागत केले.

उच्चशिक्षित अन् धडाडीच्या आयपीएस अधिकारी

आरंक्षा यादव या २०२३ बॅचच्या अत्यंत होतकरू आणि धडाडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये संपूर्ण भारतात २०१ वी रँक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले होते. मूळच्या हरियाणा राज्यातील असलेल्या आरंक्षा यादव यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्स पदवी आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून (JNU) आंतरराष्ट्रीय संबंध विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातीला त्यांची निवड गुजरात कॅडरसाठी झाली होती, मात्र विवाहानंतर त्यांची बदली महाराष्ट्र कॅडरमध्ये करण्यात आली.

कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणाला मिळणार गती

आरंक्षा यादव यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याने पोलीस प्रशासकीय कामे, कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी नियंत्रणाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे, महिला व बालकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पोलीस दलात पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी त्यांची नियुक्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 01-09-2026