Sangameshwar Woman Death: ओझरखोल येथील विवाहितेचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू

पोटदुखी व श्वसनाचा त्रास जाणवल्याने केले होते दाखल

Sangameshwar Woman Death News मुळे ओझरखोल आणि संगमेश्वर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील ओझरखोल येथील एका ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (८ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. मानसी जठ्यार (वय ३५, रा. ओझरखोल, ता. संगमेश्वर) असे या मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसी जठ्यार यांना अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने प्रथम संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

Sangameshwar Woman Death News : उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी त्यांना तातडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांना अचानक तीव्र श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत मानसी जठ्यार यांच्या पश्चात पती, सासू, सासरे आणि दोन लहान मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या एका मुलीचे वय १२ वर्षे, तर दुसऱ्या मुलीचे वय अवघे ६ वर्षे आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जठ्यार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ओझरखोल परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 10-09-2026