जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या चुरशीच्या कुस्त्या
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे १० सप्टेंबर रोजी ही स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
विविध वजनगटांत १२० खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांमध्ये कुस्तीचे सामने घेण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेचे प्रमुख नवनाथ जाधव यांनी संपूर्ण स्पर्धेचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. कुस्ती असोसिएशनचे सचिव सदानंद जोशी व ज्येष्ठ कुस्तीगीर मारुती पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती आणि खेळाडूंना प्रोत्साहन
याप्रसंगी कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, सचिव सदानंद जोशी आणि तालुका समन्वयक विनोद मयेकर यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेस असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद तापेकर, जिल्हा संघटक फैय्याज खतीब, सदस्य मानसिंग पवार, सदस्या कमल नितोरे यांच्यासह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुभवी पंचांचे चोख कामकाज
कुस्तीचे सर्व सामने निष्पक्ष व नियमानुसार पार पाडण्यासाठी अनुभवी पंचांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये मारुती गलांडे सर, सैफुदुद्दीन पठाण सर, भावेश सावंत, अतुल गराटे, गणेश गराटे, प्रणय गराटे, एम. डी. पाटील सर व जाकीर सय्यद यांनी पंच म्हणून जबाबदारी चोख पार पाडली. पारंपरिक कुस्ती खेळाला शालेय स्तरावर प्रोत्साहन देऊन नव्या पिढीतून सक्षम मल्ल घडवण्यासाठी अशा स्पर्धांची सातत्याने गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले.













