नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची पत्रकार परिषदेत माहिती; गणेशोत्सवाच्या बाजारासाठी शहरातील मैदाने केली खुली
रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषद भाविक व नागरिकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील खड्डेमुक्त रस्ते, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मैदाने खुली करणे आणि अतिक्रमण निर्मूलन या सर्व आघाड्यांवर नगरपरिषदेने युद्धपातळीवर काम हाती घेतल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील ६० टक्के खड्डे बुजवले; दोन दिवसांत रस्ते पूर्ण खड्डेमुक्त होणार
शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम दिवस-रात्र वेगाने सुरू आहे. रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्याने रात्रीही डांबरीकरणाचे काम केले जात आहे. आतापर्यंत ६० टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजवून पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्के काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. गणेश आगमनाचा मुख्य मार्ग असलेला आंबेरी/आंबेशेचा रस्ताही आता वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज करण्यात आला आहे.
मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी; संस्था सांभाळणार जबाबदारी
शहरातील रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी संस्थांशी झालेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. संबंधित संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत शहरातील सर्व मोकाट गुरे ताब्यात घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरणाचे (Sterilization) टेंडर मंजूर झाले असून ते कामही तातडीने सुरू करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरातील मैदाने खुली
रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाहेरून येणारे फळ विक्रेते, टेम्पो चालक आणि पथविक्रेत्यांसाठी पालिकेने शहरातील प्रमुख मैदाने खुली केली आहेत. साळवी स्टॉपचे मैदान, मंगळवार बाजारामागील मैदान, आठवडा बाजारामागील मैदान आणि लक्ष्मी चौकातील मैदान ही सर्व मैदाने उत्सवाच्या बाजारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रस्त्यावर टेबल किंवा गाड्या न लावता या मैदानांमध्ये जाऊन व्यवसाय करण्याचे आवाहन विक्रेत्यांना करण्यात आले आहे.
नागरिकांना मैदानांमधील बाजारातून खरेदीचे आवाहन
अतिक्रमण मोहिमेचा भाग म्हणून मारुती मंदिर परिसरातील पुढील कारवाई गणेशोत्सवानंतर अधिक तीव्र केली जाणार आहे. पादचाऱ्यांना सुरक्षित चालता यावे आणि वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांनीही रस्त्यावरील वाहनांऐवजी मैदानांमध्ये भरवण्यात आलेल्या बाजारात जाऊन खरेदी करावी, असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केले आहे.













