सर्वोच्च न्यायालयाचे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे कठोर निर्देश; परस्पर मध्यस्थीचाही दिला सल्ला
Sridevi Chennai Property Dispute प्रकरणात एक मोठी कायदेशीर बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चेन्नईतील एका अचल मालमत्तेवरून सुरू असलेला वाद आता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही कन्या – अभिनेत्री जान्हवी कपूर व खुशी कपूर यांना नोटीस जारी केली आहे.
Sridevi Chennai Property Dispute: सुप्रीम कोर्टाचे कठोर निर्देश
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती अरुण पिल्लई यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेतली. चेन्नईच्या प्रसिद्ध ईस्ट कोस्ट रोड (ECR) भागात असलेल्या या मालमत्तेबाबत कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे:
‘जैसे थे’ स्थितीचे आदेश: या वादग्रस्त मालमत्तेची सध्या जी सद्यस्थिती आहे, तीच कायम ठेवावी (‘Status Quo’). त्यात कोणताही बदल करू नये, असे स्पष्ट आदेश कोर्टाने दोन्ही पक्षांना दिले आहेत.
मध्यस्थीचा सल्ला: कोर्टाने दोन्ही पक्षांना आपापसांत चर्चा करून किंवा मध्यस्थामार्फत हा तंटा सामंजस्याने सोडवण्याचा महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.
मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान
यापूर्वी हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित होते. मद्रास हायकोर्टाने एम. सी. शिवगामी आणि एम. सी. नटराजन यांचे दावे फेटाळून लावत निकाल कपूर कुटुंबाच्या बाजूने दिला होता. मात्र, हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात शिवगामी आणि नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुलींना नोटीस पाठवली आहे.
या हायप्रोफाईल प्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. १८ डिसेंबरपर्यंत या मालमत्तेला हात लावता येणार नसून, आता कपूर कुटुंब परस्पर सहमतीने वाद मिटवते की १८ दिसंबरच्या सुनावणीची वाट पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













