शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप; बंदिस्त वाहनांऐवजी उघड्या वाहनांतून होत असलेल्या वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी
Fish Meal Transport Violation Dapoli बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील हरणे बंदरातून खराब मासे अर्थात ‘फिश मिल’ची उघड्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. या माशांच्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, फिश मिलची वाहतूक इन्सुलेटेड व बंदिस्त वाहनांमधून करण्याच्या स्पष्ट सूचना असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवली जात असल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
दापोली तालुक्यातील हरणे बंदर हे ताजी मासेमारीसाठी सर्वदूर प्रसिद्ध असून, येथील मासे पुणे, गोवा, मंगळूर आणि मुंबईसह विविध ठिकाणी पाठवले जातात. मात्र, सध्या ताज्या माशांसोबतच खराब मासे म्हणजेच फिश मिलच्या वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी या माशाचा प्रामुख्याने वापर केला जातो. खराब मासे असल्याने त्यातून तीव्र दुर्गंधी पसरते, त्यामुळे अशा प्रकारच्या माशांची वाहतूक केवळ बंदिस्त व इन्सुलेटेड वाहनांमधून करणे बंधनकारक असताना हरणे बंदरातून अनेक दिवसांपासून उघड्या वाहनांमधून थेट गोव्यापर्यंत ही वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
Fish Meal Transport Violation Dapoli: रस्त्यावर सांडणारे दुर्गंधीयुक्त पाणी आणि नागरिकांचा आरोग्य प्रश्न
या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्यामुळे हरणे ते दापोली मार्गावरील प्रवासादरम्यान रस्तालगतच्या नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये कोणतीही अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, वारंवार हा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित आरटीओ (RTO), मत्स्यव्यवसाय विभाग आणि अन्य सक्षम यंत्रणांनी या वाहतुकीची तातडीने पाहणी व तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी तसेच फिश मिलची वाहतूक केवळ बंदिस्त व इन्सुलेटेड वाहनांमधूनच होईल, याची खात्री करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.













