कोल्हापूर ते राजापूर प्रवासादरम्यान रॅकवरील सॅक पळवली; राजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर : पुणे ते राजापूर या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली सॅक अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या बॅगेमध्ये सुमारे २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर ते राजापूर प्रवासादरम्यान चोरी :
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अनुजा प्रशांत कांबळे (वय ३२ वर्षे, मूळ रा. पासार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. जैतापूर, ता. राजापूर) या २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पुणे ते राजापूर या एसटी बसमधून (क्र. MH 14 BT 2272) कोल्हापूर ते राजापूर असा प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपल्याजवळील ‘व्हिनस’ (Venus) कंपनीची काळ्या रंगाची सॅक बसमधील वरील रॅकवर ठेवली होती.
अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास :
प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गर्दीचा आणि नजरचुकीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने रॅकवर ठेवलेली ही सॅक फिर्यादीच्या परवानगीशिवाय लबाडीने चोरून नेली. या सॅकमध्ये १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील दोन टॉप्स, ३५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि १७ हजार ५०० रुपये किमतीची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

राजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद :
आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी राजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५ (क) प्रमाणे गु.र.नं. २५२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून या चोरीचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.













