पुण्यातील छंदसम्राट सामाजिक संस्थेतर्फे पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते गौरव; नाणी व नोटांच्या अभ्यासातून जगाची ओळख
रत्नागिरी: लांजा तालुक्यातील चिन्मय जगन्नाथ बेर्डे यांना विविध देशांतील नाणी व नोटा यांचा संग्रह आणि अभ्यास करण्याच्या आगळ्यावेगळ्या छंदासाठी पुण्यातील छंदसम्राट सामाजिक संस्थेतर्फे यंदाचा ‘छंदसम्राट पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अँड प्लॅनेटोरियम, ऑटो क्लस्टर चिंचवड येथे पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासू संग्राहकाच्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली आहे.
शालेय कुतूहलातून सुरू झालेला चलन अभ्यासाचा प्रवास
चिन्मय यांना लहानपणापासूनच विविध देशांतील नाणी व नोटा गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे. शाळेत एका मित्राकडून ‘परदेशात भारतीय रुपया चालत नाही आणि प्रत्येक देशाचे स्वतंत्र चलन असते’ अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मनात कुतूहल जागे झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी फायबरची विविध चलने जतन करण्यास सुरुवात केली. पुढे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांच्या माध्यमातून खरी नाणी हाती येऊ लागली; त्यावरील चित्रे, चिन्हे आणि रचनेमुळे परदेशी नाण्यांविषयीचे आकर्षण अधिकच वाढले. कालांतराने हा छंद केवळ संग्रह करण्यापुरता मर्यादित न राहता, त्यामागील इतिहास, संस्कृती, कला, परंपरा आणि चलनव्यवस्थेचा सखोल अभ्यास करण्याकडे वळला. महाविद्यालयीन काळात या विषयाचा अधिक बारकाईने अभ्यास करण्याची ओढ निर्माण झाली.
रत्नागिरीतील प्रदर्शनांची सुरुवात आणि मान्यवरांची दाद
या छंदामुळे चिन्मय यांना विविध व्यासपीठांवर आपला संग्रह मांडण्याची संधी मिळाली. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी छात्रावासात २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रदर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये रत्नागिरी नगर वाचनालयाच्या व्याख्यानमालेत त्यांनी प्रदर्शन सादर केले. २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये आर्ट सर्कलच्या थिबा महोत्सवातील कलाजत्रा प्रदर्शनात त्यांना विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होता आले, तर २०१९ मध्ये रत्नागिरीतील आर्टिस्ट्री क्लबने आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग राहिला. अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील, दीपक करंजीकर, नाट्य दिग्दर्शक राजेश देशपांडे, डॉ. गिरीश ओक यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या या छंदाचे कौतुक केले आहे.

८५००हून अधिक नाण्यांचा संग्रह आणि प्रसारमाध्यमातील दखल
चिन्मय यांच्या संग्रहात आजघडीला १४५पेक्षा अधिक देशांची एकूण ८५००हून अधिक नाणी आणि ९००हून अधिक नोटांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी लहान-मोठ्या एकूण १५ प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर त्यांच्या छंदाविषयी दोन वेळा मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत.
नाणी व नोटांच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कृतीचा वेध
विविध देशांतील नाणी व नोटांचा संग्रह करणे हा माझ्यासाठी केवळ छंद नसून, जगातील विविध देशांचा इतिहास, संस्कृती आणि वैविध्य जाणून घेण्याचे ते एक माध्यम आहे, अशी भूमिका चिन्मय यांनी मांडली आहे. प्रत्येक नाणे आणि नोट ही त्या काळाची व त्या देशाच्या संस्कृतीची एक स्वतंत्र ओळख जपून ठेवते, या दृष्टिकोनातून ते आपल्या संग्रहाकडे पाहतात.













