मुंबईकरांची तहान भागवणार कोयनेचे पाणी; ६७ टीएमसी नव्या पाणीसाठ्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईकरांची तहान भागवणार कोयनेचे पाणी; ६७ टीएमसी नव्या पाणीसाठ्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

कोयना जलविद्युत प्रकल्पातून समुद्रात वाया जाणारे पाणी मुंबईकडे वळवणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई: मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज भागवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर समुद्रात वाहून जाणारे तब्बल ६७ टीएमसी अतिरिक्त पाणी मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पुढील ५० वर्षांचे नियोजन आणि पोफळी प्रकल्पातील पाण्याचा वापर
मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने पुढील पन्नास वर्षांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन हाती घेतले आहे. या बैठकीत पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि नवीन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी वाशिष्ठी नदीमार्गे समुद्रात सोडून दिले जाते. कोयना धरणाच्या वरील भागात कोणताही मोठा प्रकल्प किंवा एमआयडीसी नसल्याने हे पाणी महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते. समुद्रात वाया जाणारे हेच पाणी जल बोगदे आणि पाईपलाईनच्या माध्यमातून मुंबईपर्यंत आणण्याबाबत शासन स्तरावर नियोजन सुरू असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईला ६७ टीएमसी शुद्ध पाणी मिळणार आहे.

कोयना धरणाचे महत्त्व आणि अभियांत्रिकी वारसा
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना नदीवर बांधलेले हे धरण राज्याच्या जलविद्युत निर्मिती, सिंचन आणि पाणीपुरवठ्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. १९५६ मध्ये सुरू झालेले या धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये पूर्ण झाले. भारतीय सरकारच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टीने उभारलेला हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना मानला जातो. भूकंपप्रवण क्षेत्रात स्थित असूनही, आजवर अनेक मोठ्या भूकंपांना तोंड देत हे धरण अभेद्य उभे आहे.

#concepts\'

युनेस्को जागतिक वारसा स्थळ आणि जैवविविधतेने नटलेला परिसर
कोयना परिसर हा पश्चिम घाटाचा एक महत्त्वाचा भाग असून, समृद्ध जैवविविधतेमुळे त्याचा समावेश ‘युनेस्को’च्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. धरणाच्या परिसरात वसलेले कोयना अभयारण्य असंख्य वनस्पती आणि वन्यजीवांचे सुरक्षित आश्रयस्थान आहे. येथील घनदाट जंगलात बिबटे, भारतीय गवे, सांबर हरीण आणि विविध सरपटणारे प्राणी आढळतात. तसेच मलबार पाईड हॉर्नबिल, क्रेस्टेड सर्पेंट ईगल आणि पॅराडाईज फ्लायकॅचर यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांसह विविध औषधी वनस्पतींनी हा परिसर समृद्ध आहे.