Ratnagiri ST Diwali Income: दिवाळीतून रत्नागिरी एसटी विभाग मालामाल; ९ दिवसांत १ कोटींचे उत्पन्न

Ratnagiri ST Diwali Income: दिवाळीतून रत्नागिरी एसटी विभाग मालामाल; ९ दिवसांत १ कोटींचे उत्पन्न

६ ते १५ नोव्हेंबर दरम्यान विशेष बससेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; लालपरीतून महिला व ज्येष्ठ नागरिकांनी घेतला सवलतीचा लाभ

रत्नागिरी: दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने राबविलेले जादा बसेसचे नियोजन यशस्वी ठरले असून, ६ ते १५ नोव्हेंबर या विशेष वाहतुकीच्या कालावधीत विभागाला अवघ्या ९ दिवसांत तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. गावी येणाऱ्या आणि सुट्ट्या संपवून परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची वाढलेली गर्दी रत्नागिरी एसटी विभागाच्या पथ्यावर पडली आहे.

मुंबई, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भापर्यंत धावल्या बसेस
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांची आणि सण साजरा करून पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. प्रवाशांचा हा वाढता ओघ लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेसचे नियोजन केले होते. या काळात मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव व बीड, तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांपर्यंत एसटीच्या बसेस धावल्या.

पाडवा आणि भाऊबीजेला प्रवाशांची मोठी गर्दी
गावी ये-जा करण्यासाठी तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांमधील पर्यटनासाठी प्रवाशांनी यंदाही हक्काच्या ‘लालपरी’लाच प्रथम पसंती दिली. विशेषतः दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. प्रवाशांच्या या प्रतिसादामुळे आणि अतिरिक्त बसेसच्या योग्य नियोजनामुळे रत्नागिरी विभागाच्या तिजोरीत १ कोटीहून अधिक उत्पन्नाची भर पडली आहे.

Arihant 1

सवलतधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक
दिवाळीच्या या विशेष वाहतूक कालावधीत शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. यामध्ये ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात सवलतधारक प्रवाशांनी मोठ्या संख्येने एसटीतून प्रवास केला असून, त्यामध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे.