वांद्रे-मडगाव आणि अजमेर-एर्नाकुलमसह ४ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांब्याची मागणी; स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत नोंदवून वेधले लक्ष
संगमेश्वर रेल्वेस्थानक उंदीर आंदोलन सध्या कोकण रेल्वे मार्गावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर विविध एक्स्प्रेस गाड्यांना तात्काळ थांबा मिळावा, या लोकभावनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री गणेशाचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या वेशभूषेत एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. आंदोलकाने थेट स्टेशन मास्तरांची भेट घेऊन तक्रार वहीत आपली मागणी अधिकृतपणे नोंदवली आहे.
या अनोख्या आंदोलनाद्वारे १०११५/१०११६ वांद्रे-मडगाव, १६३११/१६३१२ श्री गंगानगर, १२९७७/१२९७८ अजमेर-एर्नाकुलम आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर-कोईमतूर एक्स्प्रेस या चार प्रमुख साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले असून, सध्या त्यांचा मुंबई व इतर शहरांकडे परतीचा प्रवास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या थांब्यांची तातडीने गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संगमेश्वर रोड स्थानकावर या चारही गाड्यांना थांबा मिळाला, तर संगमेश्वर तालुक्यासह आसपासच्या संपूर्ण ग्रामीण भागातील प्रवाशांना थेट मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील विविध शहरांमध्ये प्रवास करणे अत्यंत सोयीस्कर होणार आहे. रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानिक चाकरमान्यांची गरज विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या सर्जनशील आणि शांततापूर्ण आंदोलनाचे स्थानिक प्रवाशांकडून कौतुक केले जात आहे. आता या अनोख्या निवेदनानंतर कोकण रेल्वे प्रशासन या चार एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर येथे कधी थांबा मंजूर करते, याकडे सर्व चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे.













