राजापूर-लांजा परिसरातील घटना; उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत घोषित, लांजा पोलिसांत नोंद
लांजा तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे रात्रीच्या वेळी विहिरीत पडून ५८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गणेश लक्ष्मण दाभोळकर (वय ५८, रा. आसगे मांडवकरवाडी, ता. लांजा) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दाभोळकर हे रात्रीच्या वेळी घरापासून काही अंतरावर असलेल्या वाडीतील विहिरीमध्ये पडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी विहिरीकडे धाव घेऊन त्यांना तातडीने बाहेर काढले. मात्र, ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून गणेश दाभोळकर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची अधिकृत खबर मयताचा मुलगा योगेश गणेश दाभोळकर (वय ३२, रा. आसगे मांडवकरवाडी) याने लांजा पोलीस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पोलीस निरीक्षक निळंकंठ बगळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या दुर्घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास लांजा पोलीस करत आहेत.













