मासू वडाचीवाडी येथे राहत्या घराच्या पाठीमागे छापा टाकून ४५० रुपयांचा दारू साठा जप्त; गुन्हा नोंद
पोलिसांनी बेकायदेशीर दारू साठ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गुहागर तालुक्यातील मासू वडाचीवाडी येथे आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस बांधाच्या आडोशाला विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही धाडसी कारवाई २० सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.
कृष्णा शांताराम कांबळे (वय ४१, रा. मासू वडाचीवाडी, ता. गुहागर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. गुहागर पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कांबळे हा आपल्या राहत्या घरामागे बांधाच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू बाळगून असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे धाड टाकून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ४५० रुपये किमतीची ४ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.
ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री ७.५५ वाजता घडली असून, याप्रकरणी पोलीस हवालदार उदय यशवंत मोनये यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १०.१९ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात अवैध दारू विक्री व निर्मितीचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.













