Konkan Railway Special Trains: गणेशोत्सवासाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या; चाकरमान्यांना मोठा दिलासा

Konkan Railway Special Trains: गणेशोत्सवासाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या; चाकरमान्यांना मोठा दिलासा

मध्य रेल्वेचा विशेष उपक्रम; सीएसएमटी-सावंतवाडी दरम्यान धावणार अतिरिक्त फेऱ्या, सर्व स्थानकांवर बुकिंग सुरू

कोकण रेल्वे विशेष गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान आणखी चार विशेष गाड्या चालविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात नियमित सेवांव्यतिरिक्त एकूण ३९० गणपती विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेने ८ सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान दैनंदिन एक्सप्रेस सेवाही सुरू केली होती. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन आता आणखी चार विशेष सेवा घोषित करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-सावंतवाडी रोड विशेष गाडी क्रमांक ०१००९ ही २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०१० ही २० व २७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्यांची रचना दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसनांसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी करण्यात आली आहे.

Radhakrushna patapedhi

गाडी क्रमांक ०१००९ चे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी युटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार असून प्रवाशांना रेलवन अ‍ॅपचाही वापर करता येईल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या वेळांची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीवर तसेच एनटीईएस अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.