३५ हजार रुपयांचा दंड वसूल तर ३६ हजार ८५० रुपयांचा मैदा व मॅंगो पल्प जप्त; आगामी नवरात्र, दसरा आणि दिवाळीतही तपासणी सत्र सुरूच राहणार
गणेशोत्सव एफडीए कारवाई अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मिठाईसह विविध दुकानांवर कडक नजर ठेवत मोठी धाडसी कारवाई केली आहे. १ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील ३ परवाने निलंबित करण्यात आले असून एका दुकानदाराचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३६ हजार ८५० रुपयांचा संशयास्पद मैदा आणि मॅंगो पल्प असा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्यभर कडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील विविध आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. १८ सप्टेंबरपर्यंत एफडीएच्या पथकाने जिल्ह्यात एकूण २६ तपासण्या केल्या असून त्यात दूध (६), खवा (२), तूप (२), तेल (४), मिठाई (१२) आणि इतर (२०) असे एकूण ४६ अन्नाचे संशयित नमुने जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यापैकी ५ दुकानदारांना सुधारणा नोटीस जारी करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान प्रशासनाने १७ हजार ५०० रुपये किमतीचा ५०० किलो मैदा आणि १९ हजार ३५० रुपये किमतीचा ६४५ किलो मॅंगो पल्प जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ललauthor/प्रतिनिधी ललित गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांत भेसळ होण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही मोहीम अविरत सुरू ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी, हॉटेलचालकांनी आणि मिठाई उत्पादकांनी अन्न सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा यापुढील काळात आणखी कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

गणेशोत्सवानंतर लवकरच नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी हे मोठे सण येत आहेत. या काळात उपवासाचे पदार्थ, मिठाई आणि मावा यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने एफडीएची विशेष पथके जिल्ह्यात सतर्क राहणार आहेत. त्यामुळे मिठाई उत्पादक, मावा विक्रेते आणि हॉटेल्सची कसून तपासणी सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













