वेळणेश्वर गटातील प्रत्येक वाडीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा मानस; स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची उपस्थिती
चिंद्रावळे डाफळेवाडी नळपाणी योजना लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला असून, गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील चिंद्रावळे डाफळेवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेमुळे डाफळेवाडीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी नेत्रा ठाकूर यांनी नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाणीपुरवठा सुव्यवस्थित सुरू असल्याची खात्री केली. यासोबतच त्यांनी डाफळेवाडी परिसरातील इतर प्रलंबित मूलभूत सुविधांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधून सविस्तर माहिती घेतली. गावागावांतील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले जात असून, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव आणि वाडीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, सरपंच तेजस्वी कांबळे, माजी सभापती दत्ताराम निकम, विनायक कांबळे, संदीप डाफळे, गंगाराम डाफळे यांच्यासह स्थानिक नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














