Chiplun Crime and Development News: छ. शिवाजी महाराज मंदिर सभागृहास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा: वालेरी येथील स्मारकासाठी प्रशासकीय हालचालींना वेग

Chiplun Crime and Development News: छ. शिवाजी महाराज मंदिर सभागृहास 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा: वालेरी येथील स्मारकासाठी प्रशासकीय हालचालींना वेग

जि. प. सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याची दखल; आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

छ. शिवाजी महाराज मंदिर सभागृहास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्याच्या मागणीला आता प्रशासकीय गती मिळाली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटातील वालेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सभागृहाचा ‘क’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वालेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असून, मंदिर परिसरातील सभागृह हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्वपूर्ण केंद्र मानले जाते. १९८७ मध्ये उभारण्यात आलेल्या या स्मारकस्थळी विविध धार्मिक कार्यक्रम, शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन तसेच विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. या स्थळाचा ‘क’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रात समावेश झाल्यास मंदिर परिसरातील मूलभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि परिसर विकासासाठी शासकीय निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

७ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शिवानी सावंत यांनी हा विषय मांडत वालेरी येथील मंदिर सभागृहाचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात समावेश करण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन शासन निर्णयानुसार आवश्यक १ ते ८ कागदपत्रांची पूर्तता करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Shanti real estate 1

प्रशासनाकडून प्रस्तावाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाल्याने वालेरी येथील या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. वहाळ गटातील ग्रामीण भागातील श्रद्धास्थानांना आवश्यक शासकीय मान्यता व विकासाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी आपण यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे शिवानी सावंत यांनी सांगितले.