Ratnagiri Mirkarwada Jetty News: मिरकरवाडा बंदरातील विनावापर नौका आणि साहित्य उद्या हटवणार

Ratnagiri Mirkarwada Jetty News: मिरकरवाडा बंदरातील विनावापर नौका आणि साहित्य उद्या हटवणार

मुदतीत साहित्य न हटवल्यास २३ सप्टेंबरपासून प्रशासकीय कारवाई; नुकसानभरपाई मिळणार नाही आणि खर्चही मालकांकडूनच वसूल करणार

मिरकरवाडा बंदर अडथळा कारवाई संदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदराच्या परिसरात अनेक नौका मालकांनी मोडकळीस आलेल्या व विनावापर असलेल्या नौका, नौका केबिन तसेच इतर अनावश्यक साहित्य अस्ताव्यस्त टाकून ठेवले आहे. यामुळे बंदरातील दैनंदिन कामकाज आणि वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने, हे सर्व साहित्य बुधवारी हटवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सर्व संबंधित नौका मालकांनी आपल्या विनावापर नौका व अनावश्यक साहित्य स्वखर्चाने २२ सप्टेंबरपर्यंत बंदर परिसरातून हटवून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत हे साहित्य न हटवल्यास, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ते हटवण्याची धडक मोहीम राबवली जाईल.

प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, या कारवाईदरम्यान नौका किंवा साहित्याचे काही नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही आणि नुकसानभरपाईचा कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही. इतकेच नव्हे, तर ही कारवाई करण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च संबंधित मालकांकडूनच वसूल केला जाणार आहे.

Mahrashi karve ANM

याशिवाय, मोहिमेच्या दिवशी म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेटी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना अनधिकृत पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या दिवशी अनधिकृत पार्किंग करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही प्रशासनाने दिला आहे.