चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून रस्ता अडवून जावई व सासऱ्याला बेदम मारहाण; चौघांविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल

चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून रस्ता अडवून जावई व सासऱ्याला बेदम मारहाण; चौघांविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल

हातातील कड्याने डोळ्यावर वार करून दिली धमकी; कोळकेवाडीतील चार तरुणांवर कारवाई

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील उक्ताड येथे रात्रीच्या सुमारास पायी जात असताना रस्ता अडवून जावयाला हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याची आणि वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर हात उचलल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळकेवाडी येथील चार जणांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडीकडे जात असताना दुचाकीस्वारांनी अडवला रस्ता :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष बाजी लोटेकर (वय ६४ वर्षे, रा. उक्ताड, ता. चिपळूण) हे २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आपले जावई समीर काकडे, ड्रायव्हर कृष्णा काळे आणि क्लिनर ओंकार चव्हाण यांच्यासोबत कालभैरव मंदिर ते उक्ताड गणेश मंदिराच्या दिशेने उभ्या असलेल्या गाडीकडे पायी चालत जात होते. ते रामभाऊ गोरीवले यांच्या घराच्या परिसरात आले असता, उक्ताडच्या बाजूने आलेल्या ॲक्टिव्हा (क्रमांक MH-08-BA-4378) आणि बुलेट (क्रमांक MH-12-XS-6164) या दोन दुचाकींवरून चार तरुण तेथे आले आणि त्यांनी लोटेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा रस्ता अडवला.

Tata tiago

कड्याने डोळ्यावर प्रहार; मध्यस्थी करणाऱ्या वृद्धालाही मारहाण :

दुचाकीवरून आलेल्या आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे आणि आर्यन अनिल शिंदे यांनी फिर्यादी यांचे जावई समीर काकडे यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हाताच्या थापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या जावयाला मारहाण होत असल्याचे पाहून ज्येष्ठ नागरिक असलेले सुभाष लोटेकर वाद सोडवण्यासाठी धावून गेले. त्यावेळी टोळक्यातील चौथा संशयित नितीन रामचंद्र शेळके याने लोटेकर यांच्या कानाखाली मारून त्यांना जोराने बाजूला ढकलून दिले. त्यानंतर आरोपींनी समीर काकडे यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला हातातील कड्याने जोरदार प्रहार करून रक्तबंबाळ केले तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

चिपळूण पोलिसांत चौघांवर गुन्हा नोंद :

या प्रकरणी सुभाष लोटेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी आयुष शिंदे, पार्थ शिंदे, आर्यन शिंदे आणि नितीन शेळके (सर्व रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११५(२), ११८(१), १२६(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गु.र.नं. २९५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.