कपाटातील बॉक्समधून सुमारे ९२ हजारांचे दागिने केले लंपास; जयगड पोलिसांत गुन्हा नोंद
जयगड : शेजारी टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात येऊन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने फिर्यादीच्या नकळत चोरून नेल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील सडेवाडी जयगड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात एका इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताने सुमारे ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
टीव्ही पाहण्यासाठी घरात येऊन केली चोरी :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडेवाडी जयगड येथील रहिवासी फिर्यादी सौ. तेजस्वीनी संकेत वाघधरे (वय ३५ वर्षे) यांच्या घरी संशयित आरोपी निलेश नारायण पाटील (वय ४५ वर्षे, मूळ रा. कोळंबे, सध्या रा. जयगड सडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा नियमितपणे टीव्ही पाहण्यासाठी येत असे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यानच्या कालावधीत संशयित वाघधरे यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी घरातील मंडळींची नजर चुकवून त्याने कपाटात ठेवलेल्या दागिन्यांच्या बॉक्समधून विविध सोन्याचे दागिने लबाडीने चोरून नेले.

९२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास :
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १२ हजार ५०० रुपये किमतीची २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील कुडी, १७ हजार ५०० रुपये किमतीच्या ३.५ ग्रॅम वजनाच्या कानातील पट्ट्या, १२ हजार ५०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे साईबाबांचे दोन लॉकेट, २५ हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, ५ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची अंगठी, ५ हजार रुपये किमतीची लहान मुलांची कानातील १ ग्रॅमची रिंग आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ असा एकूण सुमारे ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
जयगड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल :
कपाटातील दागिन्यांचा डबा रिकामा असल्याचे लक्षात आल्यानंतर आणि संशयिताबाबत खात्री पटल्यानंतर फिर्यादी सौ. तेजस्वीनी वाघधरे यांनी जयगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी निलेश नारायण पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गु.र.नं. ७४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.













