रत्नागिरीत कुत्र्याच्या पिल्लांना विषबाधा करून एकाचा घेतला जीव; अज्ञाताविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरीत कुत्र्याच्या पिल्लांना विषबाधा करून एकाचा घेतला जीव; अज्ञाताविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल

कोकणनगर परिसरातील धक्कादायक प्रकार; प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर परिसरामध्ये मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग करून त्यांचा क्रूरपणे छळ केल्याची आणि एका निष्पाप कुत्र्याच्या पिल्लाचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्र्यांच्या पिल्लांना विषारी पावडर खाऊ घातली :

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणनगर नायब नगर येथील सनराईज रेसिडेन्सी (फ्लॅट नं. जे/००१) परिसरात काही लहान कुत्र्यांची पिल्ले राहत होती. २० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या पूर्वीच्या सुमारास एका अज्ञात इसमाने या पिल्लांना मारण्याच्या किंवा छळण्याच्या उद्देशाने अज्ञात विषारी पावडर खाण्यास दिली. ही विषारी पावडर खाल्ल्यामुळे पिल्लांना तीव्र वेदना आणि असह्य यातना सुरू झाल्या.

Rotary School

एका पिल्लाचा मृत्यू, इतर पिल्लांचा क्रूर छळ :

विषबाधेमुळे एका निष्पाप पिल्लाचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर इतर पिल्लांनाही मोठ्या प्रमाणावर यातना सहन कराव्या लागल्या. हा क्रूर आणि अमानुष प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवासी तथा चालक व्यवसाय करणारे मोहम्मद सैफ समिर काझी (वय २६ वर्षे, रा. सनराईज रेसिडेन्सी, नायबनगर) यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा नोंद :

फिर्यादी मोहम्मद काझी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(a) अन्वये गु.र.नं. ३६१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग करणाऱ्या त्या विकृत अज्ञात व्यक्तीचा शोध रत्नागिरी शहर पोलीस घेत आहेत.