खडपोली-कळकवणे मार्गावर संशयित चोरीच्या दुचाकीसह उत्तर प्रदेशातील तरुण ताब्यात; अलोरे-शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल

खडपोली-कळकवणे मार्गावर संशयित चोरीच्या दुचाकीसह उत्तर प्रदेशातील तरुण ताब्यात; अलोरे-शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल

वालोटी फाट्यावर पोलिसांची कारवाई; वाहनाची कागदपत्रे सादर करण्यात अपयशी

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील खडपोली ते कळकवणे रस्त्यावरील वालोटी फाटा येथे संशयित चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला अलोरे-शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीच्या मालकी हक्काची कोणतीही अधिकृत कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वालोटी फाटा येथे पोलिसांची कारवाई :

मिळालेल्या माहितीनुसार, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुहास बापूराव सांजूरे (वय ३२ वर्षे, ब.नं. ३६७) हे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खडपोली-कळकवणे मार्गावर गस्तीवर होते. त्यावेळी वालोटी फाट्याजवळ एक तरुण हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकलवरून (क्र. MH-08-S-0884) संशयास्पदरीत्या येताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली.

Shree clinic

कागदपत्रे सादर न केल्याने दुचाकी चोरीची असल्याचा संशय :

पोलिसांनी संशयिताकडे दुचाकीच्या मालकी हक्काबाबत तसेच अधिकृत कागदपत्रांची विचारणा केली असता, तो कोणतीही वैध कागदपत्रे दाखवू शकला नाही. सखोल चौकशीत त्याचे नाव संदीप राजेश कुमार (वय २३ वर्षे, सध्या रा. वरची खेर्डी मोहल्ला, ता. चिपळूण; मूळ रा. बेलाहर खुर्द, जि. संत कबीर नगर, राज्य उत्तर प्रदेश) असल्याचे समोर आले. सदर दुचाकी त्याने कोणाची तरी फसवणूक करून अथवा कुठूनतरी लबाडीने चोरून आणल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी वाहन जप्त केले.

अलोरे-शिरगाव पोलिसांत गुन्हा नोंद :

या प्रकरणी पोलीस शिपाई सुहास सांजूरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संदीप कुमार याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ अन्वये गु.र.नं. ११२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुचाकी नेमकी कुठून आणि कोणाची चोरली आहे, याबाबतचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करत आहेत.