पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांची धडक कारवाई; आरोपीकडून अमली पदार्थ सेवनाचे साहित्य जप्त
नाटे : राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात झाडीच्या आडोशाला बसून बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका इसमाला नाटे सागरी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संशयिताविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोलिंगदरम्यान झाडीच्या आडोशाला सापडला :
मिळालेल्या माहितीनुसार, सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस पथक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास नाणार मयेकर मांगर परिसरातील रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या एका खासगी प्लॉटमध्ये रस्त्यापासून काही अंतरावर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी झाडीच्या आडोशाला जाऊन पाहिले असता एक इसम तेथे अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले.

अंमली पदार्थांचे साहित्य बाळगून करत होता सेवन :
पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव अस्लम गुलाम मालपेकर (वय ४२ वर्षे, रा. नाणार इंगळवाडी, ता. राजापूर) असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताच्या ताब्यात अंमली पदार्थ सेवन करण्याचे साहित्य मिळून आले असून तो स्वतःजवळ हे साहित्य बाळगून नशा करत असताना मिळून आला.
नाटे सागरी पोलिसांत गुन्हा नोंद :
या प्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किरण विलास जाधव (वय ३० वर्षे, ब.नं. १३५९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अस्लम मालपेकर याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ चे कलम ८(क) आणि २७ अन्वये गु.र.नं. १०१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नाटे सागरी पोलीस करत आहेत.













