लोटे येथे रुक्मिणी निवास इमारतीमागे कल्याण मटका घेणाऱ्यावर पोलिसांची धाड; एकावर गुन्हा दाखल

लोटे येथे रुक्मिणी निवास इमारतीमागे कल्याण मटका घेणाऱ्यावर पोलिसांची धाड; एकावर गुन्हा दाखल

जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कमेसह संशयित ताब्यात; खेड पोलिसांची कारवाई

खेड : खेड तालुक्यातील पटवर्धन लोटे येथील रुक्मिणी निवास इमारतीच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या कल्याण मटका नावाचा जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर खेड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली असून संशयिताविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

इमारतीच्या आडोशाला जुगार खेळवताना पकडले :

मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास खेड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या लोटे पोलीस दूरक्षेत्राचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी मौजे पटवर्धन लोटे येथील रुक्मिणी निवास या इमारतीच्या आडोशाला एक इसम लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटक्याचे आकडे लावून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून संशयिताला रंगेहात पकडले.

Arihant 2

जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त :

पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याचे नाव सचिन सुरेश चव्हाण (वय ३५ वर्षे, सध्या रा. पिरलोटे, ता. खेड; मूळ रा. कडवई वाणीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असल्याचे समोर आले. संशयिताच्या ताब्यातून जुगाराच्या नोंदी असलेले ‘कल्याण’ लिहिलेले पावती पुस्तक, कार्बन पेपर, बॉल पेन आणि शर्टच्या खिशातून २०० रुपयांची १ नोट, १०० रुपयांच्या ७ नोटा, ५० रुपयांची १ नोट व २० रुपयांची १ नोट अशी एकूण ९७० रुपयांची रोकड असा एकूण ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खेड पोलिसांत गुन्हा नोंद :

या प्रकरणी लोटे दूरक्षेत्राचे पोलीस शिपाई सुहास हिंदुराव पाटील (वय ३४ वर्षे, ब.नं. ७४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन चव्हाण याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गु.र.नं. ३१७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.