दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल; राजापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
राजापूर : राजापूर तालुक्यातील मुर चीखलेवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घराच्या पडवीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरात कोणी नसताना लावून घेतला गळफास :
मिळालेल्या माहितीनुसार, मुर चीखलेवाडी येथील रहिवासी आशिष केशव आगटे (वय २५ वर्षे) हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वीच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्याने दारूच्या नशेत राहत्या घरासमोरील पडवीतील लोखंडी बाराला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

रायपाटण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडून मयत घोषित :
हा प्रकार कुटुंबीयांच्या व स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. अवघ्या पंचविशीतील तरुणाने व्यसनातून स्वतःचे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :
या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ. क्र. ५५/२०२६) अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.













