दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून चिपळूण पेठमाप येथे ७० वर्षीय वृद्धेची गळफास लावून आत्महत्या

दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून चिपळूण पेठमाप येथे ७० वर्षीय वृद्धेची गळफास लावून आत्महत्या

राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीने घेतला गळफास; चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

चिपळूण : गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या डोकेदुखी व चक्कर येण्याच्या तीव्र त्रासाला आणि सततच्या औषधोपचारांना कंटाळून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीर्घ आजारपण व सततच्या औषधोपचारांचा मानसिक त्रास :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेठमाप परिटआळी येथील रहिवासी मंगला ज्ञानदेव भांड (वय ७० वर्षे) या गेल्या सात वर्षांपासून डोके दुखून चक्कर येण्याच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर नियमित वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, अनेक वर्षांचे हे आजारपण आणि सततच्या गोळ्या-औषधांमुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

Physciobot

बेडरूममध्ये पंख्याला साडीने लावला गळफास :

या सततच्या आजारपणाला कंटाळून मंगला भांड यांनी २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या पदराने गळफास लावून घेतला. हा प्रकार घरातील मंडळींच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून चिंचनाका येथील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :

या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ. क्र. ५८/२०२६) अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. एका वृद्ध महिलेने आजारपणातून स्वतःचे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.