दारूच्या नशेत तोल जाऊन विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज; लांजा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
लांजा : लांजा तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे दारूच्या नशेत विहिरीत पडून ५८ वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रात्रीच्या सुमारास घडली दुर्घटना :
मिळालेल्या माहितीनुसार, आसगे मांडवकरवाडी येथील रहिवासी गणेश लक्ष्मण दाभोळकर (वय ५८ वर्षे) हे २० सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असताना त्यांचा तोल गेला आणि ते वाडीतील विहिरीच्या पाण्यात पडले. विहिरीतील पाण्यात बुडाल्यामुळे त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती.

लांजा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केले मयत घोषित :
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने २१ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गणेश दाभोळकर यांना दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले.
लांजा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ. क्र. ५०/२०२६) अशी नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.













