शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर संस्कृत शिक्षणात समन्वय आवश्यक : प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर संस्कृत शिक्षणात समन्वय आवश्यक : प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत गुणगौरव समारंभ व कृतिसत्र उत्साहात संपन्न

रत्नागिरी : उच्च शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लागू झाले असले, तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर इतर विषयांच्या तुलनेत संस्कृतची अभ्यासक्रमातील स्थिती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील संस्कृत शिक्षणामध्ये योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

संस्कृत गुणगौरव व कृतिसत्राचे उद्घाटन :

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळाच्या वतीने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित संस्कृत गुणगौरव समारंभ आणि दोन दिवसीय कृतिसत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ‘संस्कृतभारती’ पश्चिमक्षेत्र प्रशिक्षण प्रमुख नीरज दांडेकर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये आणि रत्नागिरी संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्मिता सरदेसाई उपस्थित होत्या.

Ronic

संस्कृत भाषेचा समृद्ध ठेवा आणि महाविद्यालयाचे उपक्रम :

डॉ. साखळकर पुढे म्हणाले की, संस्कृत ही आपली अत्यंत प्राचीन व समृद्ध भाषा आहे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कालिदासांचे साहित्य तसेच गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, व्याकरण आणि तत्त्वज्ञान यांसारख्या सर्वच ज्ञानशाखांचे मूळ संस्कृतमध्ये सामावलेले आहे. महाविद्यालयात संस्कृतचा प्रचार अधिक प्रभावीपणे होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयात बीए, एमए संस्कृतसह इतर २८ पदवी आणि १६ पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. विशेष म्हणजे, कला शाखेव्यतिरिक्त विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही संस्कृत शिकता यावे, यासाठी महाविद्यालयाने ‘ॲबिलिटी एन्हॅन्समेंट कोर्स’ म्हणून क्रेडिट्सच्या स्वरूपात हा विषय उपलब्ध करून दिला आहे.

शिक्षकांनी बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे :

या वेळी मार्गदर्शन करताना नीरज दांडेकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशभरात सुरू झाली असून २०३० पर्यंत सर्व राज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामध्ये भारतीय ज्ञानपरंपरेचा (IKS) समावेश करण्यात आल्याने शिक्षकांनी या सकारात्मक बदलांचे स्वागत केले पाहिजे. बदलत्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमाचा विचार करून शालेय अभ्यासक्रमात सुसूत्रता आणल्यास विद्यार्थ्यांच्या अडचणी निश्चितच कमी होतील.

संस्कृत शिक्षक मंडळाचे योगदान :

अध्यक्षा स्मिता सरदेसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, संस्कृत शिक्षक मंडळ १९७८ पासून सातत्याने कार्यरत असून ज्येष्ठ शिक्षकांनी सुरू ठेवलेली परंपरा आजची पिढी पुढे नेत आहे. या कृतिसत्राचा समारोप विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आजी-माजी शिक्षकांच्या सन्मानाने होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या आयोजनासाठी डॉ. कल्पना आठल्ये यांचे सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांचा गौरव :

कार्यक्रमादरम्यान स्मिता सरदेसाई यांच्या हस्ते डॉ. मकरंद साखळकर, डॉ. कल्पना आठल्ये आणि नीरज दांडेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील संस्कृत शिक्षक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले, तर आभार डॉ. कल्पना आठल्ये यांनी मानले.