पाठीमागून येऊन केला वार; राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
*राजापूर :* राजापूर तालुक्यातील जुवाटी गावात भावोजींच्या घरासमोर उभा असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणावर पाठीमागून येऊन कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, पीडिताच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*अचानक पाठीमागून येऊन केला हल्ला*
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर दिवाकर मयेकर (वय ३७, सध्या रा. विरार वेस्ट, मूळ रा. जुवाटी, ता. राजापूर) हे २ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या भावोजींच्या घरासमोरील फणसाच्या झाडाखाली भावोजींच्या मित्रांशी गप्पा मारत उभे होते. यादरम्यान, आरोपी स्वप्निल अशोक बिर्जे (वय ४०, रा. बेनगी, पो. आडिवरे, ता. राजापूर) याने तिथे अचानक पाठीमागून येऊन हातात असलेल्या कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. या हल्ल्यात किशोर मयेकर गंभीर जखमी झाले.
*राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल*
या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या किशोर मयेकर यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी स्वप्निल बिर्जे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ११७(१) आणि ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करत आहेत.













