राजापुरात खडपेवाडी येथे घरावर पोलिसांचा छापा; तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

राजापुरात खडपेवाडी येथे घरावर पोलिसांचा छापा; तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

टेबलावर सुरू होता जुगाराचा डाव; रोख रकमेसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी केले जप्त

राजापूर : राजापूर शहरातील खडपेवाडी येथील एका घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी शनिवारी रात्री धाडसी छापा टाकला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांची पैज लावून तीन पत्ती जुगार खेळत आणि खेळवत असताना ६ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, सर्व संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

खडपेवाडीतील घरावर पोलिसांचा मध्यरात्री छापा :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील खडपेवाडी येथील रहिवासी विलास केरू पवार यांच्या घरात (घर क्र. RAJA00002035) बेकायदेशीरपणे पैशांचा जुगार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९:५५ वाजण्याच्या सुमारास राजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर घरावर छापा टाकला. यावेळी घरातील टेबलाभोवती बसून काहीजण तीन पत्तीचा डाव खेळत असल्याचे निदर्शनास आले.

Aayurzil

रोख रक्कम आणि पत्ते जप्त :

पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ पानी पत्त्यांचे ३ कॅट, २ पेन, हिशोबाची आकडेमोड लिहिलेली १ वही तसेच संशयितांच्या अंगझडतीतून रोख रक्कम जप्त केली. यामध्ये समीर शिंदे यांच्याकडून रु. ५३०/-, वीरेंद्र देसाई यांच्याकडून रु. ६१०/-, गजाननप्रसाद कोळवणकर यांच्याकडून रु. १७००/-, दीपक पवार यांच्याकडून रु. १३९०/-, मंगेश ढवळे यांच्याकडून रु. १३६०/- आणि घरमालक विलास पवार यांच्याकडून रु. २०५/- अशी एकूण ५ हजार ७९५ रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

६ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल :

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संग्राम कृष्णात नरुटे (वय ३२ वर्षे, ब.नं. ४९६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री १:०५ वाजता १) समीर रविकांत शिंदे (वय ४२ वर्षे, रा. वरचीपेठ), २) वीरेंद्र विठ्ठलराव देसाई (वय ४३ वर्षे, रा. वरचीपेठ), ३) गजाननप्रसाद विठ्ठल कोळवणकर (वय ३९ वर्षे, रा. साईनगर), ४) दीपक महादेव पवार (वय ३८ वर्षे, रा. शीळ नागरेकरवाडी), ५) मंगेश शंकर ढवळे (वय ५० वर्षे, रा. दिवटेवाडी) आणि ६) विलास केरू पवार (वय ७६ वर्षे, रा. खडपेवाडी, सर्व रा. राजापूर) या सहा जणांविरुद्ध गु.र.नं. २६४/२०२६, महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४(१)अ, ४(१)ब आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.