District Athletics Selection Trial: राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्ससाठी रत्नागिरीत जिल्हास्तरीय निवड चाचणी; थेट राष्ट्रीय स्पर्धेची संधी

१८ ऑक्टोबरला डेरवण येथे रंगणार सामने

District Athletics Selection Trial: रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने येत्या रविवारी, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स (NIDJAM) जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १४ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑक्सन विद्यापीठ, कामकोले (हैद्राबाद) येथे पार पडणार आहे.

District Athletics Selection Trial: डेरवण येथील क्रीडा संकुलात रंगणार सामने

ही जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ‘एसव्हजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ (SVJCT Sports Complex) येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होणार असून, सर्व सहभागी खेळाडूंना त्यापूर्वी घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १४ आणि १६ वर्षाखालील मुले व मुली अशा दोन वयोगटांत ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना सन्मानपूर्वक पदक व प्राविण्य प्रमाणपत्र प्रदान केले जाईल, तसेच त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

विविध क्रीडा प्रकार आणि वयोमर्यादेचे निकष

स्पर्धेत सहभागासाठी निश्चित करण्यात आलेल्या वयोमर्यादेनुसार:

  • १४ वर्षाखालील गट: खेळाडूंचा जन्म १७ नोव्हेंबर २०१२ ते १६ नोव्हेंबर २०१४ दरम्यान असावा. या गटात ट्रायथलॉन ए (६० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी), ट्रायथलॉन बी (६० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक) आणि ट्रायथलॉन सी (६० मी. धावणे, ६०० मी. धावणे, लांब उडी) हे प्रकार असतील.
  • १६ वर्षाखालील गट: खेळाडूंचा जन्म १७ नोव्हेंबर २०१० ते १६ नोव्हेंबर २०१२ दरम्यान असावा. या गटात ६० मी. व ६०० मी. धावणे, ८० मी. हर्डल्स, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आणि पेंटॅथलॉन हे क्रीडा प्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.

ऑनलाइन प्रवेश नोंदणी आणि असोसिएशनचे आवाहन

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना www.ratnagiriathletics.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२६ ही आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडापटूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर आणि सरचिटणीस संदीप तावडे यांनी केले आहे.

Tata harrier

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 06-10-2026