Ratnagiri Fodder Availability: रत्नागिरी जिल्ह्यात ८५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मोठे नियोजन

Ratnagiri Fodder Availability: रत्नागिरी जिल्ह्यात ८५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मोठे नियोजन

तीन तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; १ लाख ९६ हजार जनावरांसाठी मुबलक चारा व पाणी

Ratnagiri Fodder Availability: रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुके वगळता इतर तालुक्यांत म्हणावा तितका पाऊस न झाल्याने पहिल्या ट्रिगरमध्ये तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा आणि पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने विशेष नियोजन केले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ८५ हजार ७१० मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, मुबलक चारा आणि पाण्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

*Ratnagiri Fodder Availability: तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पालकमंत्र्यांच्या आदेशाने पंचनामे सुरू*

जिल्ह्यात लहान-मोठी मिळून सुमारे १ लाख ९६ हजार जनावरे आहेत. एकीकडे राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील ९ तालुक्यांत अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत आहेत. दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून राज्य शासनाच्या वतीने जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून ठेवणे आणि प्रसंगी चारा छावण्या उभारणे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Tata sierra

*डोंगररांगा आणि खरीप पिकांमधून चारा उपलब्धता; बियाणे वाटपाचा फायदा*

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नियोजनावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग, खरीप हंगामातील पिके आणि चारा पिकांच्या माध्यमातून जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर चारा उपलब्ध होत आहे. यापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते, ज्यामुळे सध्याच्या चारा उपलब्धतेत मोठी भर पडण्यास मदत झाली आहे.

*अतिरिक्त निधीची मागणी; मंजुरीची प्रतीक्षा*

दरम्यान, चारा उत्पादनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे (DPC) अतिरिक्त ३० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, या निधीला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. हा निधी मंजूर झाल्यास नवीन चारा बियाणे वाटपाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक मदत करणे शक्य होणार आहे.

“जिल्ह्यात सध्या चारा आणि पाण्याची उपलब्धता समाधानकारक असली, तरी भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. सध्या जिल्ह्यात मुबलक चारा उपलब्ध आहे.”

— दत्तात्रय झांजाड, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जि. प. रत्नागिरी