*रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी; कार्ड अॅक्टिव्हेशन आणि रिचार्जमध्ये तांत्रिक खोळंबा*
NCMC Smart Card Update: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून सवलतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC Smart Card) अनिवार्य करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून एसटीचा सवलतीचा प्रवास अधिकृतपणे डिजिटल आणि स्मार्ट झाला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान हे डिजिटल स्मार्ट कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले असून, कार्ड नसल्यास सवलतधारकांना पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहेत.
*NCMC Smart Card Update: बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी; अॅक्टिव्हेशन अन् रिचार्जचा खोळंबा*
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची तुफान झुंबड पाहावयास मिळत आहे. कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत असल्याने खिडक्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील अनेक सवलतधारकांनी कार्ड काढले असले तरी, अॅक्टिव्हेशन आणि रिचार्जच्या सुविधेअभावी तसेच सर्वर डाऊनच्या समस्यांमुळे कार्डचा वापर करणे कठीण होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना पूर्ण तिकिटाचे पैसे देऊनच प्रवास करावा लागत आहे.

*७ लाखांपैकी ३ लाख प्रवाशांकडेच कार्ड; ४ लाख अद्याप वंचित*
रत्नागिरी जिल्ह्यात महिला सन्मान योजना, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या पात्रांची संख्या ७ लाखांहून अधिक आहे.
*जिल्ह्यातील सवलतधारकांची आकडेवारी:*
एकूण पात्र सवलतधारक: ७ लाखांहून अधिक
आतापर्यंत नोंदणी (स्मार्ट कार्डधारक): ३ लाखांहून अधिक
रत्नागिरीतील नोंदणी: १ लाख प्रवासी
प्रलंबित नोंदणी (कार्ड नसलेले): सुमारे ४ लाख प्रवासी
कार्ड काढण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरलाच संपली असली तरी, अद्याप जवळपास ४ लाख प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढलेले नाही.
*नोंदणी पावती असल्यास सवलतीचा दिलासा*
ज्या प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी आधीच नोंदणी केली आहे, परंतु त्यांना प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. नोंदणी केलेली पावती वाहकाला (कंडक्टर) दाखवल्यास पुढील एका महिन्यापर्यंत सवलतीच्या दरात तिकीट मिळवता येणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे एनसीएमसी कार्डही नाही आणि नोंदणी पावतीही उपलब्ध नाही, त्यांना एसटीच्या नियमानुसार पूर्ण भाडे देऊनच प्रवास करावा लागेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













