लोखंडी पानकापा तारेला चिकटल्याने कोसळले खाली
दापोली: Dapoli Police Patil Electrocution घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उंबर्ले गावचे पोलीस पाटील संतोष बाळू नाचरे (वय ५०, रा. उंबर्ले गाववाडी, ता. दापोली) यांचा नारळाच्या झाडावरून नारळ काढत असताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे उंबर्ले गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमका अपघात कसा घडला?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत संतोष नाचरे हे आपले वडील बाळू गोविंद नाचरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावरून नारळ काढत होते. वडिलांनी झाडाला लावलेली लोखंडी शिडी खाली धरली होती, तर संतोष हे शिडीवर चढून हातातील लोखंडी पानकाप्याने नारळ काढत होते. दरम्यान, शिडीवरून त्यांचा अचानक तोल गेला आणि या गडबडीत त्यांच्या हातातील लोखंडी पानकापा झाडाजवळून जाणाऱ्या महावितरणच्या पोलवरील मुख्य विद्युतवाहक तारेला चिकटला. त्यामुळे संतोष यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते थेट जमिनीवर कोसळले.
रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित
मुलगा बेशुद्ध अवस्थेत खाली पडल्याचे पाहून वडिलांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील अजय सणस, प्रतीक जाधव यांच्यासह इतर ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी संतोष यांना हलवून पाहिले असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना रिक्षाने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना सायंकाळी ६ वाजता मृत घोषित केले.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू
कर्तव्यदक्ष पोलीस पाटील अशा प्रकारे अपघातात मृत्युमुखी पडल्याने उंबर्ले व परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (क्रमांक ९२/२०२६) नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.













