प्रलंबित प्रकरणांचा घेतला आढावा; सांडपाणी व्यवस्थापनाबाबत बिल्डरवर कारवाईचे एमएसआरडीसीला आदेश
Ratnagiri Lokshahi Din: रत्नागिरी जिल्ह्यातील अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून त्याचा तत्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनूज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
Ratnagiri Lokshahi Din: प्रलंबित अर्जांचा आढावा अन् तातडीने निकाली काढण्याच्या सूचना
लोकशाही दिनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा आणि प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत पडताळणी करून सर्व संबंधित विभागांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा कडक सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत एका बिल्डरविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आवश्यक ती योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.
विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती
या जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव व सागर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.














