वार्षिक उत्पन्न १ कोटी ४९ लाखांवर; सभापती संदीप सुर्वे यांनी दिली बाजार समितीच्या विविध विकासकामांची माहिती
Ratnagiri APMC Profit News: रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबवण्यात आलेली विविध विकासकामे, उत्पन्न वाढीचे नवे स्रोत आणि शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः मत्स्य व्यापाऱ्यांना बाजार समितीचा परवाना बंधनकारक केल्याचा मोठा आर्थिक फायदा बाजार समितीला झाला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात बाजार समितीला एकूण १ कोटी ४९ लाख २२ हजार ५४१ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, २३ लाख ४९ हजार ७६ रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सभापती संदीप सुर्वे यांनी दिली.
Ratnagiri APMC Profit News: मत्स्य व्यवसायाला ‘कृषी’ दर्जाचा मोठा फायदा
राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळवून दिला. याचा थेट फायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला झाला आहे. बाजार समितीने मंत्री राणे व मत्स्य व्यवसाय विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मच्छी व्यापाऱ्यांना बाजार समितीचा परवाना घेणे, मार्केट सेस भरणे आणि परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक केले. त्यामुळे मोठ्या संख्येने मच्छी व्यापाऱ्यांनी परवाने घेतल्याने बाजार समितीच्या महसुलात ऐतिहासिक वाढ झाली आहे.
विकासकामांसाठी कोट्यवधींच्या निधीचे प्रस्ताव
बाजार समितीच्या विस्तारासाठी आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत:
- देवधे (लांजा): लांजा तालुक्यातील देवधे येथे बाजार समितीच्या स्वमालकीच्या जागेत आंबा-काजू उत्पादक, प्रक्रियाधारक व व्यापाऱ्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडे २ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- नाचणे (रत्नागिरी): नाचणे येथील आवारात व्यापारी लिलाव गाळे, गोदाम आणि सौरऊर्जा प्रकल्पासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे २ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव देऊन १०० टक्के अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- उक्ताड (चिपळूण): चिपळूण उक्ताड येथील नगरपालिकेच्या हद्दीतील १९२ गुंठे आरक्षित भूखंड विनामूल्य वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या संदर्भात मुख्यमंत्री व पणन मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे.
- चिखली (गुहागर): गुहागर तालुक्यातील चिखली येथे जनावरांचा उपबाजार यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे.
काजू बी शेतमाल तारण योजना पुन्हा सुरू; व्यापाऱ्यांना वजनकाटे वाटप
बाजार समितीमध्ये मागील तीन वर्षांपासून बंद असलेली ‘काजू बी शेतमाल तारण योजना’ राज्य कृषी पणन मंडळाकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन व स्वनिधीचा वापर करून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पाच काजू बी उत्पादकांना सुमारे २२ लाख ५० हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
याशिवाय, नियमित सेस भरणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पाच काजू बी व्यापाऱ्यांना २०० किलो क्षमतेचे वजनकाटे वाटप करण्यात आले आहेत. आगामी काळात लांजा आणि राजापूर तालुक्यातील पात्र व्यापाऱ्यांनाही वजनकाटे वाटप केले जाणार असल्याचे सभापती संदीप सुर्वे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 06-10-2026














