Dapoli Nagar Panchayat Encroachment Action: दापोलीत टपऱ्या-खोक्यांवर फिरवला जेसीबी

मुख्याधिकाऱ्यांवर कुणाचा ‘प्रेशर’? अचानक केलेल्या कारवाईमुळे लहान व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप

दापोली :

Dapoli Nagar Panchayat Encroachment Action अंतर्गत दापोली नगरपंचायत हद्दीत रस्त्याकडेला खोके आणि टपऱ्या उभारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांच्या टपऱ्यांवर ६ ऑक्टोबर रोजी नगरपंचायतीने थेट जेसीबी फिरवला. नर्सरी रोड, हर्णे रोड आणि दामोळ रोड परिसरातील अनेक टपऱ्या व खोके जमीनदोस्त करण्यात आले. या अचानक झालेल्या तीव्र कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून, “गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून नगरपंचायतीला काय मिळाले?” असा आक्रमक सवाल नागरिक व व्यावसायिक उपस्थित करत आहेत.

नोटीस न देता कारवाई; पर्यायी जागेची मागणी

वर्षानुवर्षे छोट्या व्यवसायांवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय हलवण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात आली नव्हती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. केवळ एक दिवस आधी सूचना देऊन दुसऱ्याच दिवशी थेट जेसीबी आणून कारवाई करणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी विचारला आहे. ‘खोके हटवायचे असतील तर हटवा; मात्र आम्हाला आधी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या किंवा नगरपंचायतीने भाडेतत्त्वावर गाळे/दुकाने उपलब्ध करून द्यावीत’, अशी रास्त भूमिका पीडित व्यावसायिकांनी मांडली आहे.

Tata safari

कर्जाची परतफेड कशी करायची? बँक कर्जाचा प्रश्न ऐरणीवर

शासनाच्या विविध योजनांतून आणि बँकांकडून कर्ज घेऊन अनेक लघू व्यावसायिकांनी आपले छोटे व्यवसाय उभारले होते. आता व्यवसायच जमीनदोस्त झाल्याने बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे.

तहसील कार्यालयाशेजारील खोकेही हटवणार: मुख्याधिकारी महेश धुमाळ

या कारवाईबाबत बोलताना दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी स्पष्ट केले की, तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या दोन-तीन खोक्यांबाबत सध्या ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, या खोक्यांबाबत नगरपंचायत न्यायालयात जाऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिक आणि पत्रकारांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायतीची ही कारवाई सर्व अनधिकृत बांधकामांवर समान निकषाने होत आहे की यात दुजाभाव केला जातोय, तसेच मुख्याधिकाऱ्यांवर नक्की कोणाचा राजकीय दबाव आहे, यावर दापोली शहरात चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 07-10-2026