घटस्थापनेपासून होणार विविध धार्मिक विधींना सुरुवात
राजापूर :
Vadchai Mata Dasara Utsav Raypatan निमित्त राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रायपाटण गावाची ग्रामदेवता श्री वडचीआई मंदिरामध्ये येत्या ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दसरा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. घटस्थापनेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
Vadchai Mata Dasara Utsav Raypatan: विविध वाड्यांकडे दररोजच्या मंदिर सेवेची जबाबदारी
इतिहासकालीन महत्त्व आणि समृद्ध वारसा लाभलेली श्री वडचीआई माता ही परिसरातील तेरा खेड्यांची मालकीण म्हणून मानली जाते. यंदाच्या दसरा उत्सवानिमित्त मंदिरातील दररोजच्या सेवेची जबाबदारी रायपाटणमधील विविध वाड्यांकडे सोपवण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी बाजारवाडीपासून या सेवेचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर पाळेकरवाडी, बांबरकरवाडी, सनगरवाडी, बागवाडी, कदमवाडी, खाडेवाडी, गांगणवाडी, टक्केवाडी, करंजेलवाडी, पुरेवाडी आदी वाड्यांकडून नियोजित दिवशी मंदिर सेवा पार पाडली जाणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी सामुदायिक दसरा उत्सव आणि तमाशाचा कार्यक्रम
श्री वडचीआई मंदिराचा होळी उत्सव हा प्रमुख आणि मोठा उत्सव मानला जातो; मात्र नवरात्र आणि दसरा उत्सवातही भाविकांची मोठी गर्दी असते. २० ऑक्टोबर रोजी सामुदायिक दसरा उत्सव साजरा करण्यात येणार असून, रात्री सालाबादाप्रमाणे तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक परंपरा, ग्रामदेवतेवरील श्रद्धा आणि रायपाटणचा सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम या उत्सवातून भाविकांना अनुभवायला मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 08-10-2026














