Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नाना पाटेकर (Nana Patekar Passed Away) या अभिनय क्षेत्रातील लाडक्या व्यक्तिमत्त्वाचे आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यातील ‘नटसम्राट’ अशी ख्याती असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे गुरुवारी पहाटे निधन झाले. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे येथील त्यांच्या निवासस्थानी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोव्यात उपचारादरम्यान वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचे वृत्त समजताच गोव्याहून त्यांचे पार्थिव विशेष एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे पुणे विमानतळावर आणण्यात आले आणि तिथून रस्तेमार्गे डोणजे येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

गोव्यातील निवासस्थानी नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी रंगभूमीसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी डोणजे गावात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहिला होता.

अंत्यसंस्काराच्या वेळी नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो चाहत्यांनी आणि नागरिकांनी ‘नाना पाटेकर अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. संपूर्ण महाराष्ट्राने अत्यंत जड अंतःकरणाने आणि अश्रू ढाळत या महान कलावंताला अंतिम निरोप दिला.

या अंत्ययात्रेला आणि अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक तसेच कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, सुनील तटकरे, माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, अर्जुन खोतकर, रुपाली चाकणकर, सदाभाऊ खोत यांनी डोणजे येथे पोहोचून श्रद्धांजली वाहिली.

Shanti 4

चित्रपट व संगीत क्षेत्रातील अभिनेते मकरंद अनासपुरे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री नीना कुलकर्णी, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, पुरुषोत्तम बेर्डे, सुशांत शेलार, लेखक अरविंद जगताप यांच्यासह ‘नाम’ (NAAM) फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 09-10-2026