तब्येत खालावल्याने तीन विद्यार्थ्यांनी सोडले उपोषण; अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आणि विद्यार्थी आंदोलनावर ठाम
MPSC Protest Pune अंतर्गत पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एस.एम. जोशी पूल तात्काळ मोकळा करण्याचे आदेश दिले असले, तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थी आणि रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनात ७ विद्यार्थी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसले होते. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने आणि उपोषणामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने मध्यरात्री त्यांनी उपोषण मागे घेतले. ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके अशी उपोषण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि चिमुकल्या विराज शिंदे यांच्या हस्ते दूध पिऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली. उर्वरित चार विद्यार्थ्यांचे उपोषण अजूनही सुरूच आहे.
या घडामोडींवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने आणि ज्येष्ठ मंडळींच्या आवाहनानुसार तिघांनी उपोषण सोडले आहे. मात्र, MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भीमनवार यांची विकेट घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, हा आमचा आणि सर्व विद्यार्थ्यांचा निर्धार कायम आहे.”
दुसऱ्या बाजूला, पुणे पोलीस प्रशासनाने पत्रकार भवनाजवळ एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाची परवानगी नाकारली असून आंदोलनस्थळ तात्काळ मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या बैठकीत बहुतांश मागण्यांवर चर्चा होऊन आंदोलन स्थगितीचे पत्र दिले गेले होते, त्यामुळे जुनी परवानगी रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच आंदोलकांनी अन्य पर्यायी जागेसाठी अर्ज केल्यास पोलीस त्यावर सकारात्मक विचार करतील, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 09-10-2026














