गोरेगाव येथील नेक्सो येथे आयोजित भव्य सोहळ्यात सन्मान; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल
Best Principal Award सोहळ्यात श्री. साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीच्या डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन नितीन कांबळे यांना ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वतीने ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील नेक्सो गोरेगाव येथे बुधवारी (७ ऑक्टोबर २०२६) पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा गौरव प्रदान करण्यात आला.
सौ. नूतन कांबळे यांची सन २००६ मध्ये डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नेमणूक झाली होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे उद्योगमंत्री नामदार डॉ. उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि शैक्षणिक निष्ठा पाहून संस्थेने २०११ मध्ये त्यांच्याकडे शाळेच्या ‘प्रिन्सिपल’ पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून ही जबाबदारी त्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने सन २०२३ मध्ये त्यांना ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. याशिवाय, मातृसेवा फाऊंडेशन ठाणे व ‘शिक्षक ध्येय महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४ मध्ये त्यांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आता ‘टाईम्स ऑफ इंडिया’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माध्यम समूहाकडून ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ उद्योजक आदरणीय अण्णा सामंत आणि सामंत काकी यांनी सौ. नूतन कांबळे यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 09-10-2026














