कुवे-वारीशेवाडी येथील २७ वर्षीय शुभ्रा यादव यांची महिनाभराची मृत्यूशी झुंज अपयशी; पती, सासरे, दीर व सासूवर गुन्हा दाखल
Lanja Crime News अंतर्गत घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुवे-वारीशेवाडी (ता. लांजा) येथे घडली आहे. शुभ्रा ऋषिकेश यादव (वय २७, रा. कुवे-वारीशेवाडी, लांजा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पती, सासरे, दीर आणि सासू या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभ्रा यांचा विवाह १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कुवे-वारीशेवाडी येथील ऋषिकेश प्रकाश यादव याच्याशी झाला होता. विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच पती ऋषिकेश यादव (२७), सासरे प्रकाश केशव यादव (६७), दीर अनमोल प्रकाश यादव (२५) आणि सासू सुवर्णा प्रकाश यादव (५५) यांनी संगनमत करून घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी सुरू केली. यासाठी तिला अमानुष शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत होता. सासरच्या या जाचाला कंटाळून शुभ्रा यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी राहत्या घरात साडीने गळफास लावून घेतला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर महिनाभराची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १:३० वाजता संपली.
या प्रकरणी मयताची बहीण तृप्ती भालचंद्र माजळकर (वय ३२, रा. गोंडेसखल रोड, लांजा) यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी पती ऋषिकेश यादव, सासरे प्रकाश यादव, दीर अनमोल यादव आणि सासू सुवर्णा यादव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सर्व आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावली असून, पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या तरुणीचा अशा करुण अंत झाल्याने लांजा परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 09-10-2026














