Ratnagiri News: रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाला ३१ मार्च २०२७ ची अंतिम मुदत; पालकमंत्री उदय सामंत यांचे कडक निर्देश

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाला ३१ मार्च २०२७ ची अंतिम मुदत; पालकमंत्री उदय सामंत यांचे कडक निर्देश

अपूर्ण इमारतीतील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश; साळवी स्टॉप जलतरण तलावासाठी ५० लाख आणि राज्यातील पहिल्या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचाही आढावा

Ratnagiri Sports Complex संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून, तब्बल १४ वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला अखेर ३१ मार्च २०२७ ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. संथगतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, कोणत्याही परिस्थितीत निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, अपूर्ण इमारतीचा गैरफायदा घेत तेथे अवैध धंदे सुरू असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली असून, याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा जिल्हा क्रीडा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. संकुल परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.

Ratnagiri Sports Complex: क्रीडा सुविधा केवळ खेळाडूंसाठी; जलतरण तलावासाठी ५० लाखांची तरतूद
क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट आणि अन्य क्रीडा सुविधांचा वापर केवळ खेळाडूंच्या सरावासाठीच केला जावा; अन्य कारणांसाठी या सुविधांचा वापर करू नये, अशी स्पष्ट ताकीद बैठकीत देण्यात आली.

Pramod jwelrs

यासोबतच साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरण व दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा आढावा; ग्रंथपाल मीनल हळदनकर यांचे अभिनंदन
या बैठकीत रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणारे हे केंद्र महाराष्ट्रातील पहिले ठरणार असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, आवश्यक सुविधा आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी ग्रंथालय विभागाने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, रत्नागिरी नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदनकर यांना २०२४-२५ चा विभागस्तरीय ‘डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.