Honorary Wildlife Warden: चिपळूणच्या ओंकार बापट यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती; रत्नागिरीसह तीन जिल्ह्यांची जबाबदारी

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून शासन निर्णय जारी

Honorary Wildlife Warden पदावर चिपळूण येथील निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी ओंकार पांडुरंग बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने १ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या नियुक्तीनुसार ओंकार बापट यांच्याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन प्रमुख जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण कोकणातून आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी आणि लगतचा संपूर्ण कोकण परिसर समृद्ध वनसंपदा व जैवविविधतेने नटलेला आहे. या भागात विविध प्रकारचे वन्यप्राणी, पक्षी आणि दुर्मिळ सागरी जीव आढळतात. वन्यजीवांचे रक्षण करणे, मानवी हस्तक्षेप रोखणे आणि नागरिकांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे यामध्ये मानद वन्यजीव रक्षकाची (Honorary Wildlife Warden) भूमिका अत्यंत मोलाची असते. याच पार्श्वभूमीवर शासनाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये रत्नागिरी, रायगड, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे.

ओंकार बापट हे गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी तळमळीने कार्य करत आहेत. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन वन विभागाने ही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. नवीन जबाबदारीनुसार, वन्यजीवांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवणे, अवैध शिकार व तस्करीला आळा घालणे, वन विभागाला सहकार्य करणे आणि लोकजागृतीचे उपक्रम राबवणे ही मुख्य कामे ते पाहणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे वनखात्याचे अधिकारी आणि कोकणातील पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 09-10-2026

Infigo eyecare