Dapoli Bike Accident News: दापोली-हर्णे मार्गावर भरधाव दुचाकीचा भीषण अपघात; दोन तरुण गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

Dapoli Bike Accident News: दापोली-हर्णे मार्गावर भरधाव दुचाकीचा भीषण अपघात; दोन तरुण गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

गिम्हवणे येथील पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री घडली घटना; गंभीर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले

*दापोली *: Dapoli Bike Accident News संदर्भात दापोली-हर्णे मार्गावरील गिम्हवणे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अँगल आणि बॅनरला आदळल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. गिम्हवणे येथील इंडियन ऑइलच्या नवीन पेट्रोल पंपासमोरील मंदिरालगत हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वांग राजेंद्र यादव (वय १७, रा. गिम्हवणे-दापोली) आणि संकेत अमर देवळेकर (वय २४, रा. खेड) हे दोघे मित्र एमएच ०८ जे २९५२ या क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून जेवणासाठी दुर्वांगच्या घराकडे जात होते. मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणतीही वर्दळ नव्हती आणि घर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उरले असतानाच अचानक दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अँगल व बॅनरवर अत्यंत वेगाने जाऊन आदळली.

ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही तरुण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कोणत्याही विलंबाविना दोन्ही जखमींना आपल्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Swami swaru. Pat.

जखमींवर उपचार सुरू; अल्पवयीन चालकामुळे कायदेशीर कारवाईकडे लक्ष
दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले. मात्र, दुचाकी चालवणाऱ्या १७ वर्षीय दुर्वांग यादव याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती अधिक चिंताजनक बनली. त्यामुळे त्याला अधिक उपचारांसाठी सोमवारी दुपारी थेट मुंबईला हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे संकेत देवळेकर याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला असून त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून हेड कॉन्स्टेबल बुरोंडकर पुढील तपास करत आहेत. दरम्यान, दुचाकीचालक अल्पवयीन असल्याचे समोर आल्यामुळे पोलीस या प्रकरणात नेमकी काय कायदेशीर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.